Saturday 21 January 2012

यात नविन ते काय?

यात नविन ते काय?
मित्र हो,
कडेगावच्या शाळकरी मुलींच्या डोळ्यातून खडे येऊ लागल्याची भानामतीची केस विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन या पुस्तकात प्रकरण एक वर दिलेली आहे. त्यासंबंधी गळतग्यांच्या ब्लॉगवरील विचार मिसळपाव सादर झाल्यावर शेकड्याने प्रतिक्रिया आल्या. गळतग्यांचे पुस्तक एकदम डोळ्यासमोर आले. त्यातील ते प्रकरण जगाच्या कानाकोपऱ्यातील अनेक सदस्यांनी धुंडाळून वाचले. असे ब्लॉगच्या व्हिजिट्समधून निदर्शनास आले. त्यावर ‘कडेगावची भानामती दुसरी बाजू’ असा धागा उघडला गेला व त्यात ‘खेडूत’ यांनी ते त्याच गावातील रहिवासी असल्याचे नमूद करून अंनिसच्या कारवाईचे समर्थन करणारे विचार सादर केले. त्यानंतर ‘अतृप्त आत्मा’ने डॉ. नरेंद्र दाभोलकरांशी प्रत्यक्ष संवाद करून त्यांच्या पुस्तकातील याच प्रकरणात काय म्हटले आहे ते सादर केले. त्यामुळे अनेकांना ती बाजू कळली. आणि आता ओक या धाग्याला कसे उत्तर देणार अशी अपेक्षा व्यक्त केली गेली. नेहमी प्रमाणे ते पळ काढणार असा संकेतही दिला.
त्याला अनुलक्षुन सोबतचे लिखाण सादर करत आहे.
अतृप्त आत्म्या यांनी कष्टपुर्वक लेखन कार्य करून डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या पुस्तकातील मजकूर सादर करून दुसरी बाजू मांडली. त्याबद्दल त्यांचे आभार.
असे दिसते की श्री. गळतग्यांच्या पुस्तकातील प्रकरणातून ते डॉ. नरेंद्र दाभोलकराच्या म्हणण्याला आक्षेप घेतलेला वाटत नाहीत. कारण गळतगेही तेच म्हणताना दिसतात. 'प्रत्येक मुलीशी एकटी करून तिच्याशी अंनिसचे लोक लाडीगोडीने वा धाक दाखवून त्या सर्व मुलींच्याकडून त्या घटनेला आम्हीच जबाबदार होतो कारण घरच्या कष्टाच्या कामांना आम्हाला जुंपले जाई. तो जाच नको म्हणून ही शक्कल आम्ही काढली होती. असे वदवून घेतले होते.'

प्रश्न होता तो गळतग्यांनी या कथनाच्यापुढे जाऊन कडेगावच्या ग्रामस्थांनी दै. पुढारीतील दि 23 मार्चच्या अंकात वाचकांच्या पत्रव्यवहारातील पत्र. ज्याचे शीर्षकच “वस्तुस्थिती नेमकी काय?” असे आहे ते सादर केले.आणि ज्या पत्राला गुलाबराव देशमुख, डॉ. अशोक काळे, दत्तात्रय कुलकर्णी (मुख्याध्यापक – मुलींची शाळा, कडेगाव.) आदि तेथील जेष्ठ ग्रामस्थांनी दि. 16मार्चच्या दै. पुढारी पेपरमधे अंनिसने प्रसिद्ध केलेल्या प्रचाराच्या मजकुराला उद्देशून लिहिले गेलेल्या खुलाशा बाबत, त्या पत्रात जे वस्तूस्थिती काय म्हणून जे म्हटले आहे,की ‘अंनिस व विज्ञान प्रबोधिनीने लोक आले आणि त्यांनी बळजबरीने मुलींच्याकडून लिहून घेतले, फोटो काढले, मात्र मुली जर डोळ्यात आपणहून खडे घालत असतील तर त्यांच्याप्रमाणे समितीच्या लोकांनी त्यांच्या (आपल्या) डोळ्यात असेच खडे घालून (व मग ते काढून) दाखवण्याचा प्रयोग गावकऱ्यांसमोर का केला नाही?, ग्रामसभेत मुलींनी खडे डोळ्यात घालून ते काढून दाखवण्याचा प्रकार झाला नाही आणि अद्यापि डोळ्यातून खडे यायचे बंद झालेले नाही”. ग्रामसभेत तेथील जिल्हा परिषदचे सदस्य श्री. डांगे यांच्या मुलीच्याही डोळ्यातून खडे येत होते. गावाची अब्रू जाईल असा विचार करणाऱ्या सूज्ञ मंडळींनी त्यांची व इतरांची समजूत घातल्याने त्यांनी आपला राग आवरला व सभा कशीबशी संपली. आदि. जे लेखन प्रस्तूत केले आहे त्याचा. ते छापून आलेले पत्र काही गळतग्यांनी लिहिलेले नव्हते.
आता प्रश्न आहे तो अंनिसच्या या मान्यवरांनी त्यावर काही प्रतिक्रिया नोंदवली काय त्याचा. काय विचाराने त्यांनी त्या प्रकाशित पत्रावर काही भाष्य केले किंवा नाही. नसेल तर का नाही? कारण डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी त्या प्रकरणाच्या नंतर काही काळाने प्रकाशित केलेल्या पुस्तकात त्यांना उद्देशून केलेल्या सार्वजनिक पत्रातील त्या विधानांवर अंनिसतर्फे खुलासा करायची जबाबदारी त्यांच्यावर येते. ती त्यांनी पार पाडली का किंवा नाही हे महत्वाचे आहे. विशेषतः दै. पुढारीतील स्थानिक घटनेवर ताबडतोब छापलेल्या गेलेल्या प्रतिक्रियेच्या लेखनावर ‘आम्हाला ते लिखाण माहित नव्हते’ असे त्यांना म्हणता येणार नाही असे वाटते. असो,
खेडूत म्हणतात की ते त्या गावचे रहिवासी आहे आणि प्रत्यक्ष नसेल पण त्यानंतर गावात काय बोलले गेले याचे ते साक्षी आहे. त्यांनी आपले त्यावेळचे मत नोंदवले. छान आहे. पण त्याच गावात वा पेठेत ते राहात होते म्हणून त्यांचे मत ग्राह्य व्हावे असे नाही. अगदी आत्तासुद्धा त्याच शहरात, गावात राहून देखील एखादी घटना पेपरमधून कळली तेंव्हा माहिती झाली असे अनेकवेळा होते. त्यामुळे प्रत्यक्षात काय घडले याची नोंद होतेच असे नाही. हे आपण प्रत्यक्ष अनुभवतो. याचा अर्थ मला खेडूत ना खोट्यात पाडायचे नाही. पण सामान्यतः पेपर मधील लेखन अंनिस पुरक केलेले असते. त्यामुळे ते सत्यच असणार असा ग्रह होतो. गळतगे यांचा रोख अशा छापील कथनामागील सत्यता काय आहे हे शोधायचा आहे. म्हणून अंनिसच्या लेखनात छापील सत्य व घडलेले सत्य असा फरक पडणार. त्यामुळे गळतगे यांच्यासारखे कोणीही सत्याग्रही राहूनही केलेल्या त्यांच्या लेखनावर प्रत्येकदा प्रश्न चिन्ह ठोकले जाणार हे गृहित आहे. तरीही त्यांनी त्यांना अनुभवायला आलेले जे सत्य आहे ते मांडण्याचे साहस प्रत्येक प्रकरणात केले आहे. ते पुढील प्रकरणातील नोंदीवरून लक्षात येईल. अंनिसचे विचार ऐकून ऐकून ज्यांची मते टोकाची झाली आहेत त्यांना असे विरोधी लिखाण आले की प्रतिक्रिया रागावलेल्या येणार हे ओघाने येते. आता यापुढील विविध प्रकरणात देखील असेच दिसेल की त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या काही विरोधी प्रतिसादांवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून काही प्रतिउत्तर त्यांच्या पुस्तकात नमूद आहेत किंवा नाहीत. नाही तर अंनिसला सोईचे तेवढे सादर करून त्याला सत्यकथन म्हणायचे असे होणार नाही काय?
मिपावरील काहीं प्रतिसादातून भानामतीत सांगितल्या जाणाऱ्या विचित्र व बीभत्स घटना घडलेल्याच नसतात किंवा घडत नाहीत असे मत नोंदवले गेले आहे. त्या खऱ्याच असतात किंवा नाही यावर अंनिसचे काय मत आहे? उदा. या प्रकरणातील कोवळ्या मुलींच्या डोळ्यातून खडे येत होते, का येत नसताना ही ते येत आहेत असे खोटेच सांगितले जात होते याची शहानिशा करावी.
सध्या इतकेच.

No comments:

Post a Comment